Monday, April 10, 2017

वडाचे झाड

   भारतीय संस्कृती मध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्व विशद केले आहे . आपण सर्वांना परिचित असलेली सत्यवान - सावित्री ची कथा ह्या वडाच्या झाडाशी इतकी निगडित आहे कि वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीराजांचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात . 

    पुराणकाळातील  बुद्धिमान,  सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती! आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आणि म्हणूनच , आपोआप त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो

एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे.

    वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. पुराण कथेनुसार , वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या ह्या शिवाच्या जटा आहेत . प्रज्ञापुरीचे श्री स्वामी समर्थ ह्याच झाडाखाली बसत . वडाचे झाड हे दत्तगुरूंचे मूळ मानले गेले आहे . म्हणूनच , स्वामी आजोबा अनेकदा ," वडाचे झाड - मूळ पुरुष " असे झाडाला उद्देशत असत.

     त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात.

      वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतोवृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात.तसेच ,फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ असे असतात .मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्‍यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात. 

    आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.

 १. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.

 २. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.

३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.

४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. 

५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे. 

६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. 

७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो

८.पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात. 

९. वडाचे पान - अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो.  

  उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. अशाप्रकारे , अनन्य साधारण महत्व असलेले हे झाड ! ज्याच्या घराजवळ असेल , तो आजकालच्या प्रदूषणाच्या जगातही प्राणवायूने श्रीमंतच म्हणावा लागेल . 

- राहुल गुरव 

11/4/2017