Monday, April 7, 2025

जरा जपुनच ...

28 डिसेंबर – वर्षाचा शेवटाकडचा दिवस. संध्याकाळची वेळ. घरी पूजा होती. सगळी तयारी चालू होती आणि मी कामात व्यग्र होतो. एवढ्यात अचानक एक फोन आला. अनोळखी नंबर होता, पण आवाज ओळखीचा.

"अरे राहुल, मी तुझा शाळेतील मित्र, xxxx xxxx बोलतोय."
क्षणभर आठवणींचा झरा वाहू लागला. वर्ग, डबा, बॅट-बॉल, शाळेची गॅदरिंग्स – सगळं डोळ्यांसमोर आलं.

तो पुढे म्हणाला, "मी सध्या घाटकोपरला अडलोय. घरी परत जायला पैसे नाहीत. खूप अडचणीत आहे. 320 रुपये पाठवशील का ?"

मी काही विचार न करता त्याला ₹320 पाठवले. शाळकरी मैत्रीचं नातं इतकं तरल आणि पवित्र असतं की तिथे विचार करून निर्णय घेतला जात नाही. आपोआप हात पुढे होतो.

पैसे पाठवल्यावर त्याने म्हणलं, "मी ठाण्याला येतो. तू सांगशील तिथे येऊन पैसे देतो. हवं तर तुझ्या घरी येऊन पैसे परत देतो."
मी हसत म्हणालो, "घरी पूजा आहे. तू आलास तर तीच माझ्यासाठी भेट. पूजेच्या पाया पडशील, खूप समाधान वाटेल."

आणि तिथे संवाद थांबला.

आज एप्रिल महिना उजाडला आहे. चार महिने उलटून गेले, पण तो मित्र घाटकोपरहून ठाण्याला आला नाही. त्याचा ना फोन आला, ना मेसेज. ना काही स्पष्टीकरण, ना काही जबाबदारी.

₹320 कुणासाठी फारसे नसतात. मुद्दा ₹320 चा नाही आहे. मुद्दा आहे शब्दाचा. विश्वासाचा. सन्मानाचा.

मैत्री ही केवळ आठवणीत जगवायची गोष्ट नाही

शाळेची मैत्री ही खास असते. जगाच्या कोपऱ्यांत पांगलेले मित्र एकमेकांच्या गरजेला धावून जातात, हेच खरे. पण काही अनुभव शिकवून जातात की –
मैत्री गरजेची असेल, पण जबाबदारी आणि प्रामाणिकपणा ही तीव्र गरज आहे.

"मित्र म्हणून मदत केलीच पाहिजे" – हे खरे,
पण "मित्र म्हणून शब्द निभावला पाहिजे" – हे अजून खरं.

कधी कधी एक छोटीशी कृती, एक न दिलेला प्रतिसाद, एक न उचललेला फोन,
मैत्रीचा किल्ला ढासळवतो.

आज मी हा लेख लिहीतोय कोणाला दोष द्यायला नाही, तर फक्त एक गोष्ट अधोरेखित करायला –
मैत्रीमध्ये फक्त आठवणी जपल्या जात नाहीत, शब्दही जपले पाहिजेत.

शब्द तुटले की, नातंही तुटतं... आणि मग ते पुन्हा जोडणं शक्य होत नाही.

– राहुल गुरव