भारतीय संस्कृतीत प्रत्येक वृक्षाला एक वेगळं स्थान आहे. पिंपळ, वड, तुलसी यांसारखे झाडे जशी पूजनीय मानली जातात, तसंच औदुंबर वृक्षालाही अत्यंत पवित्र मानलं जातं. औदुंबराच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपल्याला फार पूर्वीपासून आहे. पण त्यामागे एक अद्भुत आणि दैवी कथा दडलेली आहे.
पुराणकथेनुसार, असुरराज हिरण्यकश्यपूने आपल्या अत्याचारांनी त्रस्त केले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून त्याचा वध केला. परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेले कालकूट विष नरसिंह भगवानाच्या नखांना लागून त्यांना तीव्र जळजळ होऊ लागली.
भगवानाच्या त्या जळजळीला शांत करण्यासाठी माता लक्ष्मीने औदुंबर वृक्षाच्या पानांचा लेप त्यांच्या नखांवर लावला. त्या क्षणापासून नरसिंह भगवानाला आराम मिळाला.
त्या प्रसंगानंतर लक्ष्मी-नरसिंह स्वामींनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की –
"आमचा वास सदैव औदुंबर वृक्षात राहील."
त्यामुळे हा वृक्ष केवळ औषधीच नाही तर दैवी आणि पूजनीय झाला.
औदुंबराच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे ही फक्त धार्मिक कृती नसून त्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य दडलेले आहे.
धर्मशास्त्रांनुसार,
"औदुंबर वृक्षाभोवती टाकलेले प्रत्येक पाऊल हे एक वाजपेय यज्ञासमान फळ देणारे असते."
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मोठे यज्ञ, पूजा नेहमी करू शकत नाही. पण औदुंबराच्या झाडाभोवती श्रद्धेने प्रदक्षिणा घातली, तर त्यातूनही आपल्याला तेवढंच पुण्यफळ मिळतं. यामुळे मन शांत होतं, श्रद्धा वाढते आणि दैवी शक्तीची अनुभूती येते.
🌿 म्हणूनच औदुंबर वृक्ष हा केवळ झाड नाही, तर भगवान नरसिंह आणि लक्ष्मीमातेचं साक्षात् निवासस्थान आहे.
No comments:
Post a Comment