रुणवाल A१ मध्ये अनेकांच्या हृदयाला जवळची असलेली एक अशी अनोखी गोष्ट होती - आयडी. खरं म्हणजे त्याचं पिल्लू असतानाच त्याने आमच्या जीवनात पाऊल ठेवलं, पण पिल्लू म्हणून आठवण राहिली नाही. जेव्हापासून मी त्याला पाहिलं, तेव्हापासून आयडी ही आमच्या बिल्डिंगची एक जीव्हाळ्याची ओळख झाली.
दररोज लिफ्टमधून उतरलं की सगळ्यात आधी त्याला पाहण्याचा आनंद अवर्णनीय असे. त्याच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा, त्याला थोडं खायला घालण्याचा आनंद वेगळाच होता. तो इतका साधा आणि निरपेक्ष होता की कधी कुणाकडे मागणंही करत नसे. कधी कधी तो दुसऱ्या मजल्यावर माझ्या घराबाहेरही येऊन थांबत असे. घरात जागा देऊ शकत नव्हतो, कारण शेजाऱ्यांचा विरोध होता, पण त्याचं घर माझ्या हृदयात नक्कीच होतं.
एकदा तो माझ्या घरातही आला होता, आणि त्यावेळी आम्हा दोघांचं नातं अधिकच घट्ट झालं. लिफ्ट जवळ येऊन त्याला हाक मारल्याशिवाय माझं बाहेर पडणं अपूर्ण वाटे. आयडीचं असं असणं म्हणजे एक हळवा क्षण होता जो दररोज सुखावणारा होता.
आज, पुण्यावरून घरी आलो आणि त्याचं रिकामं ठिकाण पाहिलं, तेव्हा हृदयाला मोठा धक्का बसला. आयडी आता इथं नाही, त्याने हे जग सोडून गेलं, यावर विश्वास बसत नाहीये. मनात असं वाटतं, त्याला एक हाक मारली की तो परत धावत येईल.
माझ्या आयुष्यातलं हे खरोखरच दुःखद पान आहे की, पुण्यात असताना त्याचे अंत्यसंस्कार मला करता आले नाहीत, त्याच्या शेवटच्या क्षणांत त्याच्यासोबत राहता आलं नाही. हा दु:खद प्रसंग मला आयुष्यभर आठवणींमध्ये राहील.
आयडी, जिथे कुठे असशील, तिथे तुला एक चांगला जन्म मिळो हीच माझ्या बापूंच्या चरणी प्रार्थना आहे.
No comments:
Post a Comment