Tuesday, December 3, 2024

व्हेटर्नरी डॉक्टर: भविष्यातील करोडपतींचं नवीन क्षेत्र

आजकाल पाळीव प्राण्यांचं प्रेम एवढं वाढलं आहे की, माणूस स्वतःच्या मुलासाठी ज्या काळजीने विचार करतो, त्याहून अधिक प्रेमाने कुत्रा किंवा मांजरीसाठी वेळ आणि पैसे खर्च करतो. एका कुटुंबात घरचं दूध कमी झालं तरी चालेल, पण बॉबीच्या बिस्किटांचा डबा भरलेला पाहिजे!

प्राण्यांच्या डॉक्टरांचं महत्त्व इतकं वाढलं आहे की, सामान्य डॉक्टरांना त्यांच्या फीची तुलना करण्याचीही लाज वाटावी. व्हेटर्नरी डॉक्टरांची क्लिनिकं एखाद्या हॉटेलसारखी दिसतात, आणि त्यांचा दर म्हणजे एखाद्या पाचतारांकित हॉटेलमधल्या मेन्यूपेक्षा जास्त. साधं जखम साफ करणं किंवा औषध देणं यासाठी 2,000 रुपयांपासून फी सुरू होते, आणि त्यानंतरची गणितं तुम्ही स्वतःच मांडू शकता.

डॉग किंवा कॅटच्या जेवणाच्या खर्चाकडे पाहिलं तर वाटतं, या प्राण्यांना रोज दिवशी पार्टीच चालू असते. त्यांच्या एक किलोच्या खाण्यात एवढा खर्च होतो की, त्यात आपल्या घरचा महिन्याचा किराणा आरामात येऊ शकतो. आणि बिस्किटं तर अशी की, ती खाल्ल्यावर स्वतःचं बिस्किट खायला लाज वाटावी.

याशिवाय त्यांचं सौंदर्य राखण्यासाठी लागणारे खर्चही भारीच आहेत – फर ट्रिमिंग, मसाज, आणि वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं. हा खर्च माणसांच्या सौंदर्य उपचारांपेक्षा महागडा आहे. आजकाल कुत्रा किंवा मांजर पाळणं म्हणजे केवळ प्रेम नव्हे, तर आर्थिक स्थैर्यही सिद्ध करण्याचा एक मार्ग झालाय.

माझ्या महत्त्वाकांक्षी मुलांना, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, त्यांना सांगतो – मानवजातीच्या सेवेसाठी डॉक्टर होण्याची वेळ गेली; आता पाळीव प्राण्यांचा डॉक्टर व्हा! त्यांच्या एक-दोन भेटीत तुम्हाला माणसांच्या महिनाभराच्या तपासणीत मिळणार नाहीत एवढे पैसे मिळतील.

पाळीव प्राणी हा आता कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे, आणि त्यांचं प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे. पण कधी कधी, त्यांच्या देखभालीचा आणि खर्चाचा विचार केला की वाटतं, माणूस हा त्यांचा "पाळीव माणूस" झालाय का?

राहुल गुरव 
04.12.2024

No comments:

Post a Comment