तो माणूस, जो रोज सकाळी डब्यात पोळीभाजी भरतो, ऑफिसची बॅग खांद्यावर घेतो आणि जीव मुठीत धरून घरातून बाहेर पडतो. तो एकटा नाही, त्याच्यासारखे हजारो आहेत—कुठे सेंट्रल, कुठे वेस्टर्न रेल्वेमध्ये गर्दीशी झुंजणारे. सकाळच्या नऊ वाजताच्या लोकलमध्ये तो कसा तरी चढतो, कधी आतमध्ये शिरतो, तर कधी गाडीतून उतरायला देखील जागा सापडत नाही. ही गर्दी केवळ "जगण्याची गरज" बनून जाते, कारण त्याचं स्वप्न साधं आहे—त्याच्या मुलांच्या डोळ्यांतील आनंद, बायकोच्या चेहऱ्यावरील समाधान.
रेल्वेच्या या ठरलेल्या गर्दीत त्याचं कसं होत असेल? पाठीवर घामाचे थेंब, मनात दिवसभराचं टेन्शन, आणि तरीही डोक्यात विचार एकच—मुलांची फी भरायची आहे, घरी उधारीचं टेन्शन आहे, बायकोला नवीन साडी घ्यायचीय. असा माणूस कधीच स्वतःसाठी काही करत नाही. त्याचा दिवस सुरू होतो "कुटुंबासाठी" आणि संपतोही त्यांच्यासाठीच.
रेल्वेच्या संध्याकाळच्या गर्दीत थकलेल्या डोळ्यांनी घरी परतणाऱ्या त्या बाबाला पाहा. त्याला न बसायला जागा मिळाली असेल, ना स्वतःसाठी वेळ. बदलापूर ते सीएसटीपर्यंत उभ्याने प्रवास करूनही त्याचा चेहरा शांत आहे, कारण त्याचं मन कुटुंबाच्या चेहऱ्यावरच्या हसऱ्या भावांमध्ये अडकलेलं आहे. कधी दोन ट्रेन बंद पडल्या, तर तिसऱ्या ट्रेनच्या दारात लटकणारा बाबा तुम्हाला दिसेल. पण तो थांबत नाही, कारण त्याच्या थांबण्याने त्याचं कुटुंब मागे पडलं असतं.
पण... घरी परतल्यावर काय होतं?
जर त्याच्या कुटुंबाने त्याला फक्त भांडण दिलं, चार प्रेमाचे शब्द न बोलता तक्रारींचा पाढा वाचला, किंवा एक गार पाण्याचा ग्लासही पुढे केला नाही, तर त्या माणसाच्या मनाचं काय होत असेल? तुमचं कधी त्याच्या कष्टांकडे लक्ष गेलं आहे का? कधी त्याच्या दुखऱ्या पायांना तेल लावलंय का? तो सांगत नाही, पण त्याचा सारा उत्साह कधीच विरून गेला असेल.
तो वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वेच्या गर्दीत स्वतःला हरवतो, फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी. त्याचा प्रवास फक्त गाडीतून नसतो, तो त्याच्या स्वप्नांच्या दिशेने असतो. आणि तुम्ही जर त्याला साथ दिली, त्याला कौतुकाचा किंवा प्रेमाचा एक शब्दही दिला, तर त्याच्या अशा झगडण्याला खरी ताकद मिळेल.
त्याचं जगणं कठीण आहे, पण तो ते सहन करतो. फक्त तुमच्या हसण्यासाठी. कधी त्याला न सांगता त्याचं कौतुक करा, त्याला प्रेमाचे दोन शब्द सांगा, आणि बघा—तो माणूस, जो आतून हरवत चालला आहे, परत जिंकायला शिकेल.
तो तुमच्यासाठी सर्व काही आहे. त्याचं महत्त्व कधीच कमी समजू नका.
No comments:
Post a Comment